वरणगांवातील नागेश्वर मंदीर परीसर बनला मद्यपींचा अड्डा
शुक्रवारी चार अल्पवयीन मद्यपींनी केला दोघांवर हल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वरणगांव । प्रतिनिधी
वरणगांव शहरातील बोदवड रोडवर असलेल्या श्री . नागेश्वर महादेव मंदिर परिसर हा सांयकाळी मद्यपींचा अड्डा बनला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांना हटकल्यास त्यांचेवर हल्ले होत असल्याने भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे . दि .१४ एप्रील रोजी अशाच प्रकारे चार अल्पवयीन . मद्यपी युवकांनी दोघांवर हल्ला करून त्यांना जख्मी केले . जख्मींना भुसावळ व जळगांव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .
वरणगांव – बोदवड अवघ्या एक कि . मी . अंतरावर पुरातन श्री . नागेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिराला निर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने येथे विविध प्रकारची कामे सुरु असून काही वर्षापूर्वी मंदिर समितीने परिसरातच कृत्रिम डोंगर उभा करून त्यावर सप्तश्रृंगी मातेचे मंदिर, भाविकांसाठी वस्तीगृह, सभागृह व लगतच खालच्या बाजूला तेरावे ज्योतिर्लिंगाची मोठा गाजावाजा करीत स्थापना केली आहे . ( आज रोजी तेरावे ज्योतिर्लिंग भग्नावस्थेत पडले आहे ) मात्र, नागेश्वर महादेव मंदिर व टेकडीवरील सप्तश्रृंगीचे मातेच्या मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने परिसरातील अर्धावस्थेत असलेल्या व्यापारी संकुले दुपारी व सांयकाळी मद्यपी व अश्लिल चाळे करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे . अशाच प्रकारे दि .१४ एप्रील रोजी सांयकाळी सिध्देश्वर नगर भागातील चार अल्पवयीन मुले मंदिराच्या टेकडीवर मद्य प्राशन (बियर ) करीत होते . अशातच वरणगांव लगतच्या तपत कठोरे येथील दिनेश कोळी हे सपत्नीक सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी आले असता मद्यपी अल्पवयीन युवकांनी त्यांचेशी वाद घालुन त्यांच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून जख्मी केले . याबाबत जख्मीने फुलगाव येथील मावसभाऊ सागर रविंद्र कोळी याला माहीती देताच तो घटनास्थळी आला असता मद्यपींनी त्याच्यावरही हल्ला करून त्याचा हात फॅक्चर करीत घटना स्थळावरून पसार झाले . या प्रकरणाची कोळी समाजाचे युवा नेते महेश सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांपैकी एकाला जळगांव तर दुसऱ्याला भुसावळातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . या प्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात रविंद्र कोळी यांनी फिर्याद दिल्यावरून राज विजय वाकोडे, हर्षवर्धन अनिल इंगळे, करण इंगळे व कृणाल (पूर्ण नाव माहीत नाही ) यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला असून सपोनि आशिषकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शना खाली घटनेचा तपास सुरू आहे . तर या घटनेने भाविकांमध्ये मंदिर प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे .
भक्त निवासाची जागा दिली आहे भाड्याने
सप्तश्रृंगी मंदिराच्या इमारती मध्ये भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे . मात्र, मंदीर प्रशासनाचा भोंगळ कारभार पाहता भक्त निवास ओस पडली आहे . याची संधी साधून मंदिर प्रशासनाच्या अध्यक्ष मंडळाने एका खाजगी अग्निशामक प्रशिक्षण संस्थेला भक्त निवासाची जागा भाड्याने दिली आहे . याबाबत मात्र, कार्य कारणीतील कुणालाही काही माहिती नसल्याचे सांगण्यात येते .
मंदिर समितीचे देणगीकडे लक्ष – सुरक्षेकडे दुर्लक्ष
या मंदिराचा तिर्थ क्षेत्रात समावेश झाल्याने कायापालट होत आहे . तत्पूर्वी मंदीराचे विश्वस्त मंडळाचे चंद्रकांत बढे सर यांनी वर्गणीतुन कृत्रिम टेकडीवर सप्तश्रृंगीचे मातेचे भव्य मंदिर उभारले आहे . मात्र, या मंदिर परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था व सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नसल्याने मंदीर परीसर मद्यपींचा अड्डा तसेच अश्लिल चाळे करणाऱ्यानांही मोकळे रान झाले आहे . यामुळे मंदीर प्रशासन समिती केवळ देणगी स्विकारण्यात मग्न असून सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .