सीयूईटीच्या विद्यार्थीसंख्येत यंदा चार लाखांनी वाढ

पुणे | राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदवीपूर्व (सीयूईटी-युजी) परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्येत ४ लाखांनी वाढ झाली आहे. यंदा १३ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत यासाठी युजीसीने गेल्यावर्षी सीयूईटी परीक्षा सुरू केली. गेल्यावर्षी एकूण ९० विद्यापीठांनी सीयूईटीमध्ये सहभाग घेतला होता. त्यातील ४४ केंद्रीय विद्यापीठे होती. यंदाची सीयूईटी २१ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३० मार्च होती. यंदाच्या परीक्षेत २४२ विद्यापीठे सहभागी झाली आहेत.

प्रा. जगदेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२२मध्ये एकूण १२ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९.९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता. तर यंदाच्या सीयूईटीसाठी नोंदणी केलेल्या १६.८५ लाख विद्यार्थ्यांपैकी १३.९९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज आणि शुल्क भरले. त्यामुळे २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाखांनी, म्हणजेट ४१ टक्क्यांनी वाढली आहे.