जिल्हा परिषदेच्या ओपीडी कक्षाला दोन महिन्यांपासून ठोकलेय टाळे

जील्ह्यात सध्या अवकाळी पावसाने आहे. त्यात वातावरणातील बदलामुळे व्हायरलचा संसर्ग वाढला आहे. परिणामी शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मात्र, सध्या जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ओपीडी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असल्याने जि. प. कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. प्रशासक राजवटीत जि.प. आरोग्य विभागाचा कारभार राम भरोसे असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जिल्ह्याचा विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने गेल्या १३ महिन्यांपासून प्रशासक राजवट सुरु आहे. या प्रशासक राजवटीत गेल्या वर्षभरात अनुकंप भरतीसह कर्मचार्यांच्या हिताचे चांगले घेण्यात आले. मात्र, जि. प. कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्यासह पदाधिकार्यांच्या आग्रहास्तव चार वर्षांपूर्वी जि.प. आरोग्य विभागाकडून मिनीमंत्रालयाच्या मुख्य गेटजवळील जागेत ओपीडी सुरू करण्यात आली होती. या ओपीडीसाठी डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली होती. तसेच एका महिला कर्मचाऱ्याची याठिकाणी औषध निर्माण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या महिला कर्मचाऱ्याची याठिकाणाहून बदली करण्यात आल्याने गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ओपीडीची सुविधा बंद आहे. सद्य:स्थितीत ओपीडी सेवा बंद असून या ओपीडी कक्षाला प्रशासक राजवटीत टाळे असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा परिषदेचे सीईओ तथा प्रशासक डॉ. पंकज आशिया यांनी लक्ष देवून हा ओपीडी कक्ष पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

जि. प. कर्मचाऱ्यांची फरफट….

सध्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील बदल होत आहे. या वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरचा संसर्ग वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारी या ओपीडी सेवेचा लाभ घेत असत. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ओपीडी कक्षाची सेवा बंद असल्याने याठिकाणी आरोग्य विभागाला कुणी वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह नागरिकांची फरफट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम…….

आरोग्य ही अत्यावश्यक सेवा असतानाही जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली ओपीडी सेवा अचानक बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी व जिल्हा परिषद सदस्य या ओपीडी सेवेत प्राथमिक उपचार घेत होते. जिल्हा परिषदेवर प्रशासक राज विराजमान होण्यापूर्वी बहुतांश जि.प. सदस्य व त्यांचे कार्यकर्ते व कामानिमित्त येणारे जिल्हाभरातील नागरिक याठिकाणी अत्यावश्यक काळात उपचार घेत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ओपीडीत वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी उपस्थित राहत होते. मात्र, त्याठिकाणी दिलेल्या डॉक्टरांचीही काही काळानंतर बदली करण्यात आली.