राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्याकांडातील सूत्रधार अटकेत

0

अहमदनगर: जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडातील सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी उल्हास मानेला बेड्या ठोकल्या. त्याला कर्जत जामखेड परिसरात अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मानेच्या तालमीत राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. या हत्याकांडानंतर उल्हास माने फरार होता. मात्र तो नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचं आढळून आल्याने, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

नगरमध्ये एका महिन्यात दुसर्‍यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडगाव पाठोपाठ जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. 28 एप्रिलला हा थरार झाला. गोळीबारात राष्ट्रवादी युवकचा जिल्हा सरचिटणीस योगेश आणि राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही चुलत भाऊ होते. नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.

जामखेड मार्केट यार्डला 28 एप्रिलला साधारणपणे पावणे सात वाजता योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन समोरासमोर बेछूट गोळीबार केला. सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डीजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न करताच हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले.