कर्नाटकच्या विजयांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
मुंबई :- निवडणुकीत आणि खेळात काही नियम असतात, पालघरच्या निवडणुकीत शिवसेनेने नियम मोडले आहेत त्यामुळे पालघरची जनता शिवसेनेला आउट करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. पालघर निवडणुकीनंतर राज्यातील चित्र वेगळ असेल, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे. कर्नाटकात भाजपने मिळवलेल्या यशानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकच्या यशानंतर आम्ही पालघरमध्ये नाकावर टिच्चून निवडून येणार, असा आत्मविश्वास दाखवत पालघरच्या निकालानंतर राज्यातील चित्र वेगळ राहील, असे संकेत दानवे यांनी दिले. पालघर लोकसभा क्षेत्रातून असलेले भाजपचे लोकसभा सदस्य, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपने वनगा कुटूंबियांना वाऱ्यावर सोडल्याचा आक्षेप श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटूंबियांनी घेतला होता. त्या अनुषंघाने भाजप सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप सोडून त्यांनी पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी घेतली. याचाच फायदा घेत राजेंद्र गावितांनी काँग्रेस सोडून भाजपकडून अर्ज दाखल केला. वनगा कुटूंबीयांना पक्षात प्रवेश देऊन या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळाले.