मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर आता सहा जागांसाठी जोरदार रंगत वाढीस लागली आहे. सहा जागांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचे प्रत्येकी ३-३ उमेदवार जाहीर करून तिढा सुटला असला तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची मनधरणी करताना प्रत्येकच पक्षाच्या नाकेनऊ येणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
या निवडणुकीसाठी येत्या २१ मेला मतदान तर २४ मेला मतमोजणी होणार आहे. आज या जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीचा मुद्दा उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन अडला होता अखेर टी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडल्याने आणि त्याबदल्यात परभणीची जागा काँग्रेसला मिळाल्याने आघाडीची बिघाडी होण्यापासून वाचली आहे.
उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असतील तर भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी आपल्या भावाला उमेदवारी न मिळाल्याने कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.
कोकणात सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना कॉंग्रेससह शेकाप आणि मनसेचा सुद्धा पाठींबा मिळाला आहे. मात्र कोकणच्या जागेबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. भाजपसोबत असलेले खासदार नारायण राणे शिवसेनेच्या उमेदवाराला कितपत मदत करतील? याबाबत शिवसेनेच्या गोटात शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोकणातील रायगड विधानपरिषदेत काटे की टक्कर होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधानपरिषदेसाठी आघाडीचे उमेदवार
उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
हे देखील वाचा
नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – इंद्रकुमार सराफ (कॉग्रेस)
परभणी-हिंगोली – सुरेश देशमुख (कॉंग्रेस)
अमरावती – अनिल माधोगडिया (कॉंग्रेस)
विधानपरिषदेसाठी युतीचे उमेदवार
विपुल बजोरिया – हिंगोली-परभणी (शिवसेना)
नरेंद्र दराडे – नाशिक (शिवसेना)
राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (शिवसेना)
उस्मानाबाद-बीड-लातूर – सुरेश धस (भाजप)
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे-पाटील