नियोजित नाट्यगृहास निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे – सुनिल इंगळे

साऱ्या विश्वाला आपल्या काव्याने भाराऊन टाकणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा काव्यरूपी ठेवा अनमोल आहे आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या प्रतिभारुपी साहित्याला अनमोल सोन्याच्या मोहऱ्यांचा हंडा म्हटले आहे.

अरे संसार संसार पासुन ते जगणं न मरण एका श्वासाचा अंतर या व अशा हजारो ओवींनी बहिणाबाईंनी जगाला तत्वज्ञान शिकविले. आपल्या सहज व सोप्या काव्याने अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली. अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांची सरकार दरबारी मात्र सतत उपेक्षाच होत आलेली आहे. त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापासून ते त्यांच्या काव्याची, साहित्याची शासनातर्फे नेहमी अनास्थाच दिसून आली आहे.

बहिणाबाईंची कर्मभूमी सोडता महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठेही दखल न घेता त्यांचे स्मारक अथवा एखाद्या नाट्यगृहाला नावही दिसून येत नाही. अंबरनाथ नगरपरिषदेच्या पुर्णावस्थेत येणाऱ्या नाट्यगृहास निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत.

अंबरनाथ मधील सुजाण नागरिक, नाट्यरसिक या आमच्या मागणीला नक्कीच पाठींबा देतील. तरी आपण या संदर्भात आमच्या मागणीला आपल्या ठरावात रूपांतर करून हजारो बहिणाई रसिकांची मागणी पुर्ण कराल. या अपेक्षेमध्ये अशी मागणी बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनिल इंगळे यांनी केली आहे.