अवैध वाळु वाहतुकीचे वाहन पोलीसांनी केले जप्त

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगांव व परिसरात रात्री तसेच दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतुक केली जात आहे. मात्र, याकडे संबधीत महसुल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने गौण खनिज माफियांचे चांगलेच फावले असून त्यांची वाहने सुसाट धावत आहेत. अशाच एका वाळु भरलेल्या सुसाट डंपरने मंडळाधिकारी यांच्या वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून ते वाहन पोलीसांनी जप्त केल्याने हे प्रकरण वाहन धारकाच्या चांगलेच अंगलट येणार आहे .

 

वाळु वाहतुकीस बंदी असतानांही भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत . यासाठी लागणारी वाळु प्रत्यक्षात मात्र, महसुल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशिवार्दाने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा गोरख धंदा सुरु असल्याने बांधकामेही जोरात सुरू आहेत . यामुळे वाळु बंद असल्याच्या नावाखाली जादा रक्कम उकाळली जात असल्याने अवैधरित्या वाळु वाहतुकदारांचे चांगलेच फावले असून वाळु वाहतुकदारांनी रात्री व दिवसा ढवळ्या वाळुची वाहतुक सुरु केली आहे . यामध्ये अवैधरित्या होणारी वाळू वाहतुकीची वाहने ( डंपर ) रस्त्याने सुसाट धावतांना दिसून येत आहेत. अशा वेळी अपघात झाला तरी वाहन चालक त्याची कुठल्याही प्रकारे चिंता करीत नसल्याने महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे . अशाच प्रकारे वाळु वाहतुक करणाऱ्या सुसाट डंपर चालकाने भुसावळ ते वरणगांव मार्गावर मंडळाधिकाऱ्यांच्या खासगी वाहनाला कट मारल्याने या डंपरची चौकशी केला असता त्यामध्ये वाळु भरलेली आढळून आली. यामुळे हे वाहन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . मात्र,अद्यापपर्यंत महसुल विभागाकडून तक्रार नोंदवण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

 

विना क्रमांकाचे डंपर महामार्गावर कसे ?

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतुक केली जात आहे . या वाहतुकीसाठी विना क्रंमाकांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचे समोर येत असल्याने अशी विना क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावतातच कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे . तर वाहन धारकांवर किरकोळ कारणावरून कारवाई करणारे पोलीस प्रशासन व परिवहन मंडळाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे .