न्युयोर्क:सायबर हल्लेखोर अमेरिकन कम्युनिकेशन सिस्टम्सना हॅक करण्याची शक्यता असल्याचे मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणिबाणी लागू केली आहे. आणिबाणी लागू करताना अमेरिकेने कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नाही. परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयामागे चीनची दिग्गज टेलिकॉम कंपनी हुआवे या कंपनीचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुआवे ही नेटवर्क सप्लाय करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. चीनचे सरकारच ही कंपनी चालवत असल्याचा आरोप कंपनीवर अनेकदा करण्यात आला आहे.
अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या या आणिबाणीमुळे अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या यंत्रणेला बळकटी आणण्यास मदत मिळणार असल्याचे, मत फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांनी व्यक्त केले. तसेच अमेरिकेने उचललेले हे पाऊल अमेरिकेच्या नेटवर्कचे संरक्षण करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हुआवे या कंपनीच्या उपकरणांचा वापर अमेरिकेची मित्र राष्ट्र करू नये यासाठी ट्रम्प प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले आहेत. यापूर्वी हुआवे आणि ZTE कॉर्पच्या उपकरणांचा वापरावर बंदी घालण्याच्या अध्यादेशावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली होती. यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने हुआवेवर अमेरिकेच्या टी मोबाइल या कंपनीचे तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप लावला होता. याव्यतिरिक्त गुप्त माहिती चोरणे, बँकांची दिशाभूल करणे आणि अमेरिकेच्या व्यापारसंबंधी धोरणांचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी अमेरिकेने हुआवे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तब्बल 23 खटले दाखल केले होते. हुआवे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मेंग वानझू यांना याच प्रकरणी कॅनडामध्ये अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना अमेरिकेकडे सोपवण्यात यावे, यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे.