शहादा, ता. 26: वीज वितरण कंपनी तर्फे आकडेमुक्त मोहीम राबवित पाच वसाहतींना आकडेमुक्त करण्यात यश आले. शहरातील श्रमिकनगर, कुकडेल, गरीब नवाज, समता नगर आणि सिद्धार्थ नगर येथे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून या कॉलन्या आकडेमुक्त केल्या आहेत. तेथे अधिकृत वीज कनेक्शन देऊन तेथील वीजचोरीसह गळतीही रोखली आहे. या कारवाईमुळे नियमित वीज बील भरणाऱ्या नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्य विद्युत वितरण कंपनीचा शहादा शहरातील अनेक भागात आकडे टाकून वीज चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप व सहायक अभियंता सुजित पाटील यांनी नियोजन करून सापळा रचून आकडे टाकणाऱ्या वीज चोरांवर दंडासह कारवाई केली. वीज चोरीचा भरणा करून पुन्हा चोरी करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. विभागात महावितरणच्या ज्या भागात वीज गळतीचे प्रमाण जास्त होते. अशा भागात सर्व्हे करून केबल टाकण्याचे नियोजन करण्यात आले असून टप्याटप्याने केबल टाकण्यात आले. त्यामुळे वीज कनेक्शन घेण्यासाठी महावितरण कार्यालयात ग्राहकांनी गर्दी केली. गर्दी लक्षात घेता एक खिडकी योजनेसारखे कर्मचारी बसवण्यात आले. ज्यादिवशी ग्राहकांनी अर्ज जमा केले त्याच दिवशी ग्राहकांना वीज कनेक्शन देण्यात आले. शहरातील ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतल्याने शहरातील फिडरवरील भार कमी झाला आहे. वीज गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याचे शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी सागितले.
शहादा विभागातील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा दोन अशा सर्व उपविभागातील अभियंता यांना आपल्या भागात वीज गळतीचे प्रमाण पाहून उपाययोजना कराव्यात अशी सूचना देण्यात आल्या आहेत. आपापल्या विभागात वीज चोरी होत असेल तर संबंधितांवर कारवाई करा. महावितरण वीज विकत घेतल्यानंतर ती ग्राहकांना विकत असते. ग्राहकांना चांगल्या दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण नेहमी कटिबंध आहे. त्यामुळे वेळेत वीज बिल भरणा करावा. दर शनिवारी व रविवारीही वीज भरण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. शहादा विभागातील वीज चोरी पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. हे पथक शहरात विविध ठिकाणी फिरून कारवाई करीत आहे. नागरिकांनी वीज कनेक्शन घेवून कटू कारवाईपासून मुक्ती घ्यावी, असे महावितरणकडून सांगण्यात आले.