भुसावळ- पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीच होणारा गदारोळ गुरूवारच्या सभेतही कायम राहिला तर तत्कालीन सत्ताधार्यांनी अवघ्या काही मिनिटात सभा आटोपती घेण्याची परंपरा गुरुवारच्या बैठकीतही सत्ताधार्यांनी कायम ठेवली. तब्बल दोन वर्षांपासून पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या काळात एकही सभा चालली नसल्याचे आज पुन्हा प्रकर्षाने दिसून आले.
सत्ताधारी व विरोधकांच्या कलगीतुर्यामुळे शहरवासीयांचे निव्वळ मनोरंजन होत असून यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असून यासाठी दोन लाख लोकांनी तुम्हाला निवडून दिले का? असा प्रश्नही आपसुक सुज्ञ मतदार सत्ताधारी व विरोधकांना उपस्थित करीत आहेत. सर्व विषयांवर सत्ताधार्यांनी चर्चेची तयारी दर्शवली असलीतरी विरोधकांनी मात्र पाणीप्रश्नावरच बोलण्याचा हेका कायम धरल्याने सत्ताधार्यांनी अवघ्या 17 मिनिटात सभा आटोपती घेत सर्व 41 विषयांना मंजुरी देत सभागृहाबाहेर पाय काढला.
या प्रकारानंतर विरोधक अधिकच संतप्त झाले व त्यांनी सत्ताधार्यांच्या कागदोपत्री सुरू असलेल्या शहराच्या विकासाच्या गप्पांवर शेलक्या शब्दात टिकेची झोड उठवली.
माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव
भोसरी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना एसीबीने क्लीनचीट दिल्याने त्यांचा सभागृहाने अभिनंदनाचा ठरावा करावा, अशी सूचना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात उंचावून त्यास अनुमोदन दिले. खडसे यांचे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी भुसावळ शहराच्या विकासासाठीदेखील प्रयत्न केल्याचे प्रा.नेवे यांनी प्रसंगी सांगितले.
नगरसेविका पती सभागृहाबाहेर
गुरुवारची सभा वादळी होणार हे गृहित धरून एरव्ही पालिकेच्या सभागृहात ठाण मांडून असलेले नगरसेविका पती यांना मात्र यावेळी सभागृहाबाहेर पोलिसांनी काढले. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी सभेसाठी चोख बंदोबस्त राखला.
17 मिनिटात 41 विषयांना मंजुरी
पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गुरुवारी 11.13 वाजता सुरुवात झाली. सभेच्या सुरूवातीला दिवंगतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी प्रकरणात एसीबीने क्लीनचीट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर सत्ताधार्यांनी त्यास हात उंचावून अनुमोदन दिले.
विषय क्रमांक एकचे वाचन होत असताना विरोधी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला असून त्याबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या? कुठे-कुठे पालिकेचे टँकर सुरू आहेत ? याची नगराध्यक्षांनी माहिती द्यावी, अशी भूमिका मांडली. त्यावरून नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, एक वर्षांपूर्वी एकही टँकर सुरू नव्हता. पालिकेकडील तीन टँकरची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले. यावर ठाकूर यांचे समाधान न झाल्याने त्यांनी कुणा-कुणाला टँकर दिले आहेत, त्यावर चालक कोण आहेत? याची विचारणा करीत नगराध्यक्षांनी उत्तर द्यावे, असे सांगितल्याने वाद अधिकच विकोपाला गेला.
भोळे यांनी ही सभा विषयावरील अजेंड्यासाठी असल्याचे सांगताच विरोधक अधिकच संतप्त झाले. गटनेता उल्हास पगारे, नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत आधी शहराच्या पाणीप्रश्नावर काय उपाययोजना केल्या ते सांगा, जनतेचे पाण्यासाठी हाल होत आहेत त्यामुळे हा प्रश्न गंभीर असल्याने त्यावरच बोलावे, असे सांगताच नगराध्यक्ष व विरोधकांचा आवाज वाढल्याने सभागृहात अधिकच गोंधळ वाढला.
यावेळी सभागृहात तैनात पोलिसांनी वाद सोडवून नगरसेवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी विरोधी नगरसेवक व काही सत्ताधारी नगरसेवक उभे राहिल्याने सत्ताधार्यांनी सर्व विषयांना मंजुरी असल्याचे सांगत सभागृहाबाहेर पाय काढला. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होते.
सभागृहाची गोंधळी परंपरा
भुसावळ पालिकेच्या सभागृहात गोंधळाची परंपरा नवीन नाही. यापूर्वीच्या तत्कालीन सत्ताधार्यांच्या काळातही दोन मिनिटात सभा आटोपल्याचा इतिहास जुनाच आहे. तोच कित्ता आत्ताचे सत्ताधारी गिरवत आहेत. दोन लाख लोकांनी मोठ्या विश्वासाने सत्ताधारी असो की विरोधी नगरसेवक असो यांना निवडून दिले आहे त्यामुळे या नगरसेवकांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी वा जनहिताच्या प्रश्नांना सभागृहात स्थान मिळून सामोपचाराने हे प्रश्न सुटावेत ही भोळ्या जनतेची अपेक्षा आहे मात्र दरवेळी सभा गुंडाळली जात असल्याने शहरातील ‘समस्या जैसे थे’ आहेत. या गोंधळी परंपरेने शहराचे नाव बदनाम होत असून उद्योजकही यायला तयार नाहीत हेदेखील तितकेच खरे !
शहर विकासाच्या या 41 विषयांना मंजुरी
सर्वसाधारण सभेत 41 विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. त्यात प्रभाग क्रमांक दोनमधील डॉ.आंबेडकर नगर, कवाडे नगर, समता नगर, दादासाहेब रूपवते नगर परीसरात आरसीसी गटारींचे बांधकाम, रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्सची दुरुस्ती, भुसावळ पालिका हद्दीत खांब्यांवर पथदिवे बसवणे, पाणीपुरवठा केंद्रात अॅलम खरेदी करणे, क्लोरीन गॅस खरेदी करणे, नगरपालिका मालकीच्या संत ज्ञानेश्वर उद्यानासह डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाचे नूतनीकरण करणे, नाहाटा चौफुली ते अष्टभूजा देवी दरम्यान डिव्हायडर तयार करणे, शहरात प्रवेश करणार्या रस्त्यांवर प्रशस्त प्रवेशद्वार उभारणे यासह अन्य विकासकामांना मंजुरी देण्यात आली.