बायकोला टोमणे मारणे ठरू शकते घटस्फोटाचे कारण

0

चंदिगढ-आपल्या बायकोला तिच्या रंगावरुन टोमणा मारण्याची सवय तुम्हाला असेल तर पुढच्यावेळी थोडा विचार करा. कारण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका महिलेला याच कारणावरुन घटस्फोट घेण्यासाठी परवानगी दिली आहे. पतीकडून क्ररता आणि वाईट वागणूक दिली जात असल्याचे सांगत न्यायालयाने घटस्फोट घेण्यासाठी महिलेला परवानगी दिली आहे. महिलेने न्यायालयात याचिका दाखल करत पती नेहमी रंगावरुन सर्वांसमोर टोमणा मारत असल्या कारणाने, तसंच स्वयंपाक व्यवस्थित केला नाही तरी रंगावरुन बोलत असल्या कारणाने वेगळं राहण्यास भाग पडलो असल्याचे  सांगितले होते.

न्यायालयात केले सिद्ध
महिलेने आपल्याला क्रूरता आणि वाईट वागणूक मिळत असल्याने सासरच्यांपासून वेगळे राहण्यास भाग पडलो असल्याचे सिद्ध केले आहे, असे न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले आहे. ‘महिलेने न्यायालयात जे पुरावे सादर केले आहेत त्यावरुन तिला मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे’, असेही न्यायालयाने सांगितले.

याआधी कुटुंब न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली होती. मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. न्यायाधीश एम एम एस बेदी आणि गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने महिलेना घटस्फोट घेण्यासाठी परवानगी देणारा निकाल दिला आहे. महिलेच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पती तिचा छळ करत होता. महिलेला वारंवार काळी असल्याचा टोमणा मारत अपमान केला जात होता. स्वयंपाक व्यवस्थित न केल्यानेही हा टोमणा मारला जात होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये महिलेने पतीचं घर सोडलं आणि माहेरी निघून आली. यावेळी महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांशी संपर्क साधून चर्चा करुन प्रकरण सोडवावं अशी विनंती केली. मात्र त्यांना नकार देत मुलाचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिली असं वकिलाने न्यायालयात सांगितले.