महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ८ ते १२ मे दरम्यान लागण्याची शक्यता

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणारा हा निकाल असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. ८ ते १२ में या काळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच तारखांकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तीचे घटनापीठ होते. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे ८ ते १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे. २० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगले, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा दिल्ली केंद्र सरकारचे प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झाले आहे. १७ जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे.