सत्ताधाऱ्यांनी विरोध झुगारून केला आहे ठराव – नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला संताप 

वरणगाव नगरपरिषद स्थलांतराला नागरीकांचा विरोध

वरणगाव ।प्रतिनीधी

नगरपरिषदेचे कार्यालय शासकीय विश्रामगृह जवळील नवीन इमारतीत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांना लागताच त्यांनी नगरपरिषद कार्यालय गाठून मुख्याधिकारी समीर शेख यांच्या समोर समस्या मांडली तसेच स्थलांतराबाबत संताप व्यक्त केला. यामुळे नगर परिषद स्थलातंराला नागरीकांचा विरोध होत असल्याने हा विषय चांगलाच गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वरणगाव येथील ग्रामपंचायतीचे सन – २०१४ मध्ये नगर परिषदेत रुपातंर झाल्यानंतर ग्रामपंचायत इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करून नवीन स्वरूप देण्यात आले. मात्र, नगरपरिषदेच्या विस्तारलेल्या कार्यालयीन कामकाजासाठी जुन्या इमारतीची जागा कमी पडत असल्याने रेल्वे स्थानकाजवळील शासकीय विश्रामगृह लगतच्या जागेवर नवीन इमारत बांधकाम करून या ठिकाणी गावातील नगरपरिषद स्थलांतर करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार सुसज्ज नगरपरिषद इमारतीच्या बांधकामास सन -२०१८/१९ मध्ये सुरुवात झाली असून इमारतीचे काम पूर्णत्वास येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने कार्यालयीन कामकाज नविन इमारतीत स्थलातंर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची नागरीकांना माहीती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह नगरपरिषद कार्यालय गाठून मुख्याधिकार्‍यांवर समस्येबाबत प्रश्नांचा भडीमार करीत संताप व्यक्त केला. यामुळे नगर परिषद स्थलातंराला नागरीकांचा विरोध होत असल्याने हा विषय चांगलाच गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असून नगर परिषदेची नविन वास्तु उद्घाटना पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने नोंदवला आहे स्थलातंराला विरोध

वरणगांव नगर परिषद कार्यकारी मंडळाने शासकीय विश्रामगृह लगतच्या जागेवर नगर परिषद कार्यालयाची नविन इमारत बांधकाम करण्याचा ठराव केला होता. मात्र, या ठरावाला विरोधी गटातील सदस्यांनी विरोध करूनही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बहुमताच्या बळावर ठराव मंजुर केला. तर या ठरावाला विरोध दर्शवून वरणगांव शहर काँग्रेस कमिटीचे अशफाक काझी, पंकज पाटील, शैलेश बोदडे, प्रशांत सोनवणे, नईमुद्दीन काझी, वसीम खाटीक यांचेसह इतर पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

बहुमताच्या बळावर केला ठराव 

वरणगांव नगर परिषद कार्यालय स्थलांतर करण्याचा विषय भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी सभागृहात मांडला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्थलांतराला विरोध केला . मात्र, बहुमताच्या बळावर ठराव मंजूर करण्यात आला व नविन इमारतीचे काम सुरु झाले. आता मात्र, स्थलांतराचा विषय चांगलाच गाजणार आहे .