उरुळी कांचन: जहाल मतवादी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव, शिवाजी महाराज उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याच्या यज्ञांचा संघर्ष पेटविला. दैनिक केसरी, मराठा यासारखे वृत्तपत्र सुरू करून राष्ट्रभक्तीची भावना जागृत करून जनजागृती केली व स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची ज्योत तेवत ठेवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच हा मंत्र प्रत्येक भारतीयांच्या नसानसामध्ये भिनवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा दुग्ध शर्करा योग म्हणजे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. राष्ट्रभक्तांचे, क्रांतिवीरांचे ,विचारवंतांचे, प्रज्ञावंतांचे ,समर्पित त्यागमय जीवन हे प्रेरणादायी व स्फूर्तीदायक आहे, असे मत जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. सरस्वती प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ.रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. यापुढे मार्गदर्शन करताना डॉ.रवींद्र जी भोळे म्हणाले की विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी व देशासाठी त्यागमय जीवन जगणाऱ्या विभूतींचे स्मरण राहण्यासाठी येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरू करावा. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक दृष्ट्या कमी शिकलेले होते परंतु जीवनामध्ये भरपूर अनुभव घेऊन प्रज्ञावंत बनले, लोकशाहीर बनले, व पददलित समाजासाठी प्रबोधन करून त्यांची व्यथा जनतेसमोर, सरकार समोर मांडली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे भाषणे इंग्लिश, मराठी , हिंदी मधून झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी सौ जयश्री पाटोळे, सौ पल्लवी लोंढे, सौ आरती जाधव प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर, संजय कुंजीर सर,किरण तळले सर, सौ मनीषा मेमाणे, कु.लीना दिवार यांनी केले.