नवी दिल्ली- ५,५८४ किलो वजन असणाऱ्या GSAT-11 या उपग्रहाचे आज बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचे सांगितले जात आहे.
याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवले होते. GSAT-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास GSAT-6A अनियंत्रित झाला होता आणि २९ मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
यानंतर GSAT -11चे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चे प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांतिकारक ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला १०० गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.