जळगावचे इसिस कनेक्शन?

0

PMO किंवा हवाई यात्रेदरम्यान हल्ल्याची धमकी

पाच मोठ्या शहरांमध्ये आत्मघाती हल्ल्यांची तयारी केल्याचा दावा

जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत देशातील सर्वच यंत्रणा व्यस्त असताना देशातील प्रमुख पाच मोठ्या शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी फेसबुकवरील एका पोस्टद्वारे देण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, संशयिताचा युध्द पातळीवर शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी प्राथमिक तपासात ‘जळगाव कनेक्शन’ समोर आले असून, संशयित आरोपी मध्य प्रदेशात पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली, मुंबई यासारखी शहरे आधीपासूनच दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्टवर  आहेत.

फेसबकुवरील अतिया रिचार्ज या अकाउंटवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा असून, पोस्टमध्ये संशयिताने स्वतःचे नाव मोहम्मद कलीमद्दीन खान दिले आहे. तसेच तो स्वतःला ‘जैश ए मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा सदस्य म्हणवून घेत आहे. तसेच पोस्टमध्ये इसिसच्या चिन्हाशी साधर्म्य असलेला फोटोदेखील टाकला आहे.

पाच मोठ्या शहरांमधील आत्मघाती हल्ल्यांची योजना मूर्त स्वरुपात साकार करण्याठी तेथे याआधीच आत्मघाती हल्लेखोर आणि दारुगोळा पोहोचला आहे. पुलवामा हल्ला हा केवळ एक नमुना होता. त्यापेक्षा भयानक हल्ले आता होतील, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.  

PMO वरही हल्ल्याची धमकी

देशाच्या भावी पंतप्रधानांनी सांभाळून राहावे. पंतप्रधान कार्यालय किंवा हवाई दौरा किंवा अन्यत्र कुठे काहीही होऊ शकते, असा इशारा पोस्टमध्ये देण्यात आला आहे.   यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती. यात शरीक-ए-हयात इरशाद बेगम खान, मेरी जान, मेरा भाई मोहम्मद रहीमउद्दीन खान हे देखील माझ्यासोबत असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. आम्हाला स्वर्गात नक्कीच स्थान मिळेल, असेही म्हटले आहे.

पाठीवर वार करीत नाही

आम्ही पाठीवर वार करीत नाही म्हणूनच सर्व काही सांगत आहे. सरकारने आम्हाला पकडून दाखवावे, अन्यथा सर्वनाश स्वतःच्या डोळ्यांना पाहावा, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.