पुणे-पुण्यातील कल्याणीनगर येथील प्रसिद्ध बिशप शाळेमध्ये दोन मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील एका तरुणाने इंटरनेटवरून पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव भिकू इदाते या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
राजमुद्रा असलेले लेटर पॅड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव इदाते याच्या ओळखीच्या काही व्यक्तीच्या मुलांना पूर्व प्राथमिक आणि तिसरीमध्ये बिशप शाळेत प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश मिळणे कठीण असल्याने प्रणवने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केले. त्यावरून शिफारस पत्र देखील तयार केले.
गुन्हा दाखल
या पत्रामुळे तातडीने मुलांना प्रवेश मिळेल असे त्याला वाटले. त्याच दरम्यान बिशप शाळेच्या प्राचार्य शेन मेकफरसन यांना याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयातील सामाजिक तपास पथकाने पुण्यात येऊन चौकशी केली. त्या चौकशीतून ते पत्र बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्रणव भिकू इदाते याला अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.