महोबा – प्रशासनाने वारंवार सुचना दऊनही लग्न समारंभात होणाऱ्या गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव नाही. अशीच एक घटना महोबा जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका अवैध पिस्तुलाने केल्या गेलेल्या गोळीबारात तीन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. गोळी लागून जखमी झालेल्या आशीष नावाच्या चिमुकल्याला कानपूरला उपचारासाठी हालवण्यात आले आहे. तर दोन चिमुकले पुष्पेंद्र आणि आदर्श यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपी जग्गाचा शोध घेत आहेत. ही घटना महोबा शहरातील कोतवाली भागात असलेल्या नारूपुरा मोहोल्ल्यात घडली. येथे छक्की कुशवाहा यांच्या मुलीच्या लग्न समारंभात हा प्रकार घडला. यावेळी काही लोक नाच-गाण्यात मस्त होते, तर काही दारूच्या नशेत होते.
याचवेळी मोहोल्ल्यातील जग्गा नावाचा एका व्यक्ती कार्यक्रमात आला आणि डिजेच्या तालावर नाचू लागला. यानंतर त्याने आपल्या कमरेला असलेले अवैध पिस्तूल काढले आणि अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. यात पुष्पेंद्र ११, आदर्श १० आणि आशीष १२ हे जखमी झाले. यापैकी आशीषची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कानपूरला हालवण्यात आले आहे. तर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.