वरणगांव । प्रतिनिधी
दिपनगर विज निर्मीती केंद्रातील कोळश्याची कालबाह्य झालेली राख पाईप लाईनद्वारे वेल्हाळे जवळच्या कृत्रिम तलावात टाकली जाते . मात्र, या पाईप लाईनची भंगार चोरट्यांकडून वारंवार चोरी केली जाते . अशाच प्रकारे बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास तिन भंगार चोरटे कटरने पाईप लाईनची चोरी करतांना सुरक्षा पथकास आढळुन आले . मात्र . त्यांनी आडमार्गाने ट्रॅक्टरसह पळ काढल्याने त्यांचे विरुद्ध वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
दिपनगर विजनिर्मिती केंद्रातील कालबाहय झालेल्या कोळशाची राख १० ते १२ किलोमीटर अंतरावरील वेल्हाळे जवळील कृत्रिम तलावात पाईप लाईनद्वारे वाहून टाकली जाते . मात्र, या बीडच्या पाईपांची रात्री – अपरात्री भंगार चोरट्यांकडुन गॅस कटरच्या साह्याने चोरून करून लंपास केली जात असल्याने प्रशासनाने या मार्गावर सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवली आहे . त्यानुसार सुरक्षा रक्षकांना ( दि.१९ ) बुधवारी रात्री दोन वाजता पाईप लाईन गॅस कटरने चोरी करतांना आढळुन आले . याबाबत त्यांनी वरीष्ठांना माहिती दिल्याने वरीष्ठांनी वरणगांव पोलीस ठाण्यातील दोन पोलीसांना सोबत घेवुन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला . मात्र, चोरट्यांना याची चाहुल लागताच त्यांनी ट्रॅक्टरसह आडमार्गाने पोबारा केला . या दरम्यान चोरट्यांची ओळख पटल्याने राजेश हरी तळेले , रा. किन्ही (वय -३०) कनिष्ठ सुरक्षा अधिकारी यांनी वरणगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून ऋषिकेश महाजन , सुनील जोहरे व प्रतीक जोहरे
(सर्व रा. पिंपळगांव खुर्द ) यांचे विरुद्ध वीस हजार रुपये किमतीचे ८०० किलो वजनाचे पाईप चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला . तर सदरहू चोरटे यांनी दिपनगर प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेत सुरक्षा रक्षक म्हणून केल्याचेही समोर आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .
शेतकऱ्यांना होतो त्रास
चोरटे राखेची पाईपलाईन तोडुन नेत असल्याने उर्वरीत पाईप लाईन मधील राख मोठ्या प्रमाणात परीसरात पसरते . यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो . मात्र, दिपनगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .