‘..तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू’; हिंदू राष्ट्राबाबत धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री गुजरात दौऱ्यावर आहेत. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध केला जात असला तरी हजारो भाविक बागेश्वर बाबांच्या दरबारात सहभागी होतात. तत्पूर्वी सुरतमध्ये बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राबाबत पुन्हा एक मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ज्या दिवशी गुजरातमध्ये, भारतात हिंदू लोक कपाळावर टिळा लावून रस्त्यावर फिरू लागतील. त्या दिवशी भारत हिंदू राष्ट्र होईल. फक्त भारतच नाही तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू. पाकव्याप्त काश्मीरला प्रभू श्रीराम आणि हिंदुस्तानची गरज आहे, पाकिस्तान पीओकेला सांभाळू शकत नाही.

माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मी फक्त एकाच पक्षाचा आहे. ती पार्टी म्हणजे बजरंग बलीची आहे. गुजरातच्या भूमीला नमन करतो. येथील लोकांची जगभरात पोहोच आहे. गुजरातच्या लोकांशी स्पर्धा करून विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे, असंही धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.