मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक निकालाबाबत आपली भूमिका मांडली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. यापुढील कोणत्याही निवडणुकीत युती नाही अशी घोषणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना वारंवार तुम्ही सरकारमध्ये आहात का, असा प्रश्न विचारला, मात्र आजचा दिवस लोकशाही वाचवण्याचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर देणे टाळले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेत युती तोडण्याची घोषणा करणार की काय, असा प्रश्न होता.