स्वातंत्र्यापासून फुलसिंगनगर तांड्याला रस्ताच नाही; भीक मागून मुख्यमंत्र्यांना निधी देणार

0

मुंबई-देश स्वतंत्र झाल्यापासून आजवर फुलसिंगनगर तांड्याला अद्याप रस्ताच उपलब्ध झालेला नाही. शासनाकडे निधी शिल्लक नाही असे दोन ओळीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे उमरगा तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत आम्ही भीक मागत येतो. भीक मागून जमा झालेली सर्व रक्कम सरकार दरबारी जमा करतो. त्यानंतर तरी मायबाप सरकारने त्या पैशातून आमच्या तांड्याला रस्ता तयार करून द्यावा, अशी अफलातून मागणी उमरगा तालुक्यातील फुलसिंग नगर तांडावासियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कर्नाटक सीमेवर

देश स्वतंत्र झाल्यापासून आजवर फुलसिंगनगर तांड्याला अद्याप रस्ताच उपलब्ध झालेला नाही. देशभरातील नागरिकांसाठी रस्त्यांचे जाळे विणले जात असताना आमच्या वाट्याला मात्र हा दुजाभाव का ? की आम्ही या देशाचे नागरिक नाहीत ? असा आक्रमक सवाल तांड्यावरील नागरिक विचारीत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उमरगा तालुका वसलेला आहे. तेथून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर फुलसिंग नगर अर्थात पाटील तांडा आहे. साडेपाचशे लोकवस्ती असलेल्या या तांड्याला मागील सत्तर वर्षापासून रस्त्याची प्रतिक्षा आहे.

रेशन कार्ड जमा करून घ्या 

सातत्याने रस्त्याची मागणी करून देखील तांड्यावरील नागरिकांच्या प्रश्नाची जिल्हा पातळीवर गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे स्वतः उमरगा तालुक्याचे सुपुत्र आहेत. खासदार, आमदार, पालकमंत्री अशा सगळ्यांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर तीस किलोमीटर पायपीट करीत तांड्यावरील नागरिकांनी रस्ता देत नसाल तर आमचे रेशन कार्ड जमा करून घ्या, असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते.

प्रस्तावाला मंजुरी

आंदोलनाची दखल म्हणून दोन कोटी रुपयांच्या रस्ता मंजुरीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत तसा प्रस्तावही ग्रामविकास खात्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर मात्र माशी कुठे शिंकली हे अद्याप कळाले नाही. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही प्रस्ताव नेमका कुठे रखडला हे तांड्यावरील नागरिकांना अजूनही माहीत नाही. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडेदेखील याबाबत पाठपुरावा सुरू केला.

दोन ओळींचे उत्तर

पंतप्रधान कार्यालयातून नागरी विकास मंत्रालयाच्या मनीषा पाठणकर यांनीही याबाबत निर्देश दिले. वनसंवर्धन विभागातील अधिकारी नीलेश ठाकूर यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. तेथून तो ग्रामविकास मंत्रालयात परत गेलाच नाही. आता शासनाकडे निधी शिल्लक नाही असे दोन ओळींचे उत्तर तांडावासीयांना प्राप्त झाले आहे. शासनाकडे पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पैसे गोळा करू असा इशारा तांड्यावरील नागरिकांनी दिला आहे.

१५ दिवसाची मुदत

राज्य सरकारकडे खरोखरच पैसे नसतील तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर करावे. म्हणजे आम्ही शासनाकडून रस्ता मिळेल ही आशा सोडून गावोगावी भीक मागू. उमरगा ते मंत्रालय भिक मागून जमा झालेली रक्कम देवेंद्र फडणवीस यांना देऊ. त्यातून त्यांनी आमच्या तांड्याला रस्ता तयार करून द्यावा. अशी आक्रमक मागणी करीत फुलसिंग नगर तांड्यावरील ग्रामस्थ आणि बसव प्रतिष्ठानच्यावतीने १५ दिवसांची मुदत देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.