राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका लागण्याची चर्चा

मुंबई |प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी होत आहे. शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. पण याबाबत शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना मला असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. अर्थात पवार यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळाही काढता येतो. त्यामुळे आता केवळ न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. सर्वच राजकीय पक्षांचीही निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे.
सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील निकाल अजून आलेला नाही. सुनावणीत पहिले तीन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर आता 28 फेब्रुवारीपासून शिंदे गटाचे वकील बाजू मांडतील. मात्र, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि आमदार अपात्र ठरले तर राज्यात राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेला बदलेल? याबाबत चर्चा चालू आहे. यावर गुरुवारी रात्री कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेची राळ उठली आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावेच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांचं सूचक विधान!
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी केलेल्या चर्चेमध्ये पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलेनाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असे मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असे वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

म्हणून मंत्रिमंडळ विस्तारही लांबला
राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराचीही अनेकदा चर्चा झाली. मात्र विस्तारासाठीही न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा लागून आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. अपात्रतेची कारवाई झाली तर मुख्यमंत्रीही आमदार म्हणून अपात्र ठरतील, त्यामुळे सरकार पडेल. ही नामुष्की नको म्हणून शिंदे — फडणवीस सावध पाऊले उचलत आहेत.