राजकीय दुकानं बंद होतील, या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आहेत, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

आयोध्या ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अ‍ॅलर्जी होती, अनेकांना या दोऱ्यामुळे त्रासही झाला. त्यांनी टीका केली. परंतु अयोध्या हा आमच्या आस्थेचा विषय आहे, हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१४ मध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही सरकार बनवलं. २०१९ लाही तेच होणार होतं. परंतु स्वार्थ आणि खुर्चीच्या लालसेपोटी त्यांनी (उद्धव ठाकरे) चुकीचं पाऊल उचललं. परंतु आठ महिन्यांपूर्वी आम्ही ती चूक सुधारली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या लोकांना लांब ठेवलं, त्यांच्यासोबतच यांनी सरकार बनवलं होतं. बाळासाहेबांच्या विचारांशी दगा केला. परंतु आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन ती चूक सुधारली. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्य मिळाला आणि शिवसेना हे नावही मिळालं.