पिंपरी-घरफोडी करून पळ काढणाऱ्या टोळीचा डाव पिंपरी पोलिसांनी उधळून लावला. घरफोडीसाठी तलवार आणि कोयते घेऊन आलेल्या चौघांपैकी एकाला पोलिसांनी इमारतीमधून अटक केली. सोसायटीतील या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुधवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास चार चोरटे मोहननगर परिसरातील लोखंडे हॉस्पिटलजवळ दिसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. तिथून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली.
पिंपरी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाली असताना ही टोळी एका सोसायटीतून दुसऱ्या सोसायटीत घुसली होती. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत, महिला पोलीस कर्मचारी सुषमा पाटील, झनकर, पोटकुले, सोनवणे आणि भोपे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या पायरी जवळ सापळा रचला. हातात तलवार आणि कोयते घेऊन असलेली ही टोळी तीन घरफोड्या करून पायऱ्यांवरुन खाली उतरत होती. पोलिसांना बघताच चोरटे तिथेच थांबले.
चोरट्यांना शरण येण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, चोरट्यांनी यावर शक्कल लढवली. पोलिसांनी मागे व्हावे, यासाठी एकाने स्वतःवरच वार करुन घेतला. ‘हातातील शस्त्र खाली ठेव, तुम्हाला चारही बाजूंनी पोलिसांनी घेरलेलं आहे, आता शरण येण्याशिवाय पर्याय नाही’, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, यानंतर त्या चोरट्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकाने त्या चौघांचा पाठलाग केला. यातील तीन जण पळ काढण्यात यशस्वी झाले. तर एकाला पोलिसांनी अटक केली.