सावधान… या बँकांचे आहेत नकली अॅप !

0

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या बहुतांश गोष्टी मोबाइलवरच केले जाते. एका क्लिकवर शक्य झाल्याने बँक व्यवहारासाठी कंपन्यांची अॅप्लिकेशन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशाप्रकारचे अॅप वापरणे धोक्याचे असल्याचे नुकतेच समोर आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर काही बँकांची नकली अॅप्लिकेशन तयार करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, सीटी बँक, इंडिअन ओवरसीस बँक, बँक ऑफ बडोदा, येस बँक या बँकांची बोगस अॅप तयार करण्यात आली असून त्याचा गैरवापर करण्यात येत आहे.

या अॅपमध्य बँकांचे लोगो जसेच्या तसे लावण्यात आल्याने हे अॅप बनावट असल्याचे ओळखणे अवघड झाले आहे. याद्वारे हजारो लोकांची माहिती चोरली गेल्याचे सोफोज लॅब्स या आयटी सुरक्षा कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे बँकांना आपली अशाप्रकारे बनावट अॅप असल्याची माहितीच बँकांना नसल्याचे समोर आले आहे.

या अॅपद्वारे ग्राहकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून भुलवण्यात येत आहे. यामध्ये व्याजरहीत कर्ज, मोफत मोबाईल डेटा, कॅशबॅक सुविधा देऊन अॅप डाऊनलोड करण्यासाठी भूल पाडण्यात येते. एसबीआयने आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून काही बँकांनी आपल्यावर चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र अशाप्रकारे ग्राहकांचा डेटा लीक होत असेल तर ही अतिशय धोक्याची गोष्ट असल्याची चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. आता बँका याबाबत काय कारवाई करणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.