मंगळवारी उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे एका जिहादीचा चकमकीत खात्मा झाला. त्याला मारण्याची पोलिसांचीही इच्छा नव्हती. म्हणून तर दिर्घकाळ त्याच्याही संवाद साधून वा अन्य मार्गाने त्याला समजावण्याचा प्रयासही करून झाला होता. अखेरीस त्याचीच इच्छा पुर्ण झाली आणि तो चकमकीत मारला गेला. त्यानेच कमांडोंवर गोळ्या झाडून त्यांना आपल्यावर उलट्या गोळ्या झाडण्यास भाग पाडले. या दरम्यान पोलिसांनी सैफ़ुल्लाच्या पित्याशी संपर्क साधला होता आणि पित्यानेही त्याची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. आपल्या समजूतीच्या आहारी गेलेल्या सैफ़ुल्लाने आत्मघात करून घेतला. आता त्याच्या मनस्थितीचे विश्लेषण सगळेच शहाणे करीत आहेत. पण कोणालाही त्याच्या पित्याची, सरताज यांची भूमिका समजून घेण्याची गरजही वाटलेली नाही. यापेक्षा मोठी बौद्धिक दिवाळखोरी असू शकत नाही. कारण सरताज या पित्याच्या उक्ती व कृतीमध्ये जी सकारात्मकता आहे, ती समाजाला उपयोगी आहे. मार्गदर्शक आहे, तितकीच ती भूमिका गोंधळलेल्या मुस्लिम समाजाला दिशा दाखवणारी आहे. विचार करायला लावणारी कृती या पित्याने केलेली आहे. कुणीतरी मुंबईत बॉम्बस्फ़ोट करून शेकडो निरपराधांचे जीव घेतले आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला असतानाही त्याच्या फ़ाशीसाठी अश्रू ढाळणारे हजारो लोक आपण मुंबईत बघितले. याकुब मेमनला फ़ाशीतून वाचवायला वा त्याचे समर्थन करायला पुढे आलेल्या बुद्धीमंतांपेक्षा, कर्तव्यकठोर असा सैफ़ुल्लाचा पिता, सरताज महत्वाचा आहे. त्याने जी भूमिका यावेळी मांडली, ती मोलाची आहे. पण त्यातला आशयही ज्यांना उमजलेला नाही, ते आपले शहाणपण मिरवत आहेत. त्याच नकारात्मक भावनेने आज जगाला भेडसावलेले आहे. काय आहे त्या पित्याची भूमिका?
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “2” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]
आपला मुलगा बहकलेला होता आणि त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयास केल्यावरही त्याने देशद्रोह केला; म्हणून सैफ़ुल्लाच्या पित्याने पुत्राचा मृतदेहही स्विकारण्यास नकार दिला आहे. पोटच्या गोळ्याला देशापेक्षा महत्व नसल्याची ही भावना, राष्ट्राचा पाया मजबूत करीत असते. धर्मही मायभूमीशी द्रोह करण्यास मान्यता देत नाही, अशी भूमिका सरताज यांनी घेतली आहे आणि म्हणूनच त्यांनी सैफ़ुल्लाच्या कृत्याला नुसता देशद्रोह नाही, तर धर्मद्रोहही मानले आहे. कुठल्याही देशातल्या मुस्लिमाने कोणत्या धर्मनितीचा अवलंब करावा, त्याचेच उदाहरण या पित्याने घालून दिले आहे. भावना, कौटुंबिक जिव्हाळा वा धार्मिक श्रद्धा व राष्ट्र यांची इतकी सुंदर सांगड सहसा घातली जात नाही. कुठल्याही विचारवंताने आजवर इतक्या सहजपणे कृतीतून अशा गुंतागुंतीच्या विषयात इतके सुंदर उदाहरण समोर मांडलेले नाही. अशावेळी सरताज या सैफ़ुल्लाच्या पित्याने दाखवलेला ठामपणा कौतुकास्पद आहे. खरे तर त्याच्यावर साग्रसंगीत चर्चा व्हायला हवी. कारण त्यातली सकारात्मकता आजच्या गोंधळलेल्या भारतीय समाजासाठी उपयुक्त आहे, उपकारक आहे. त्यापासून अनेक मुस्लिम कुटुंबातील वादावादीची कोंडी फ़ुटू शकेल. हजारो मुस्लिम घरातील, कुटुंबातील मुले आज जिहाद वा इसिसच्या जंजाळात फ़सलेली आहेत. धर्म, देश वा माणूसकी यांच्याविषयी त्यांच्या मनात कमालीचा गोंधळ उडालेला आहे. त्यामधून त्यांना जगण्याची वाट शोधावी लागते आहे. इस्लाम धर्माच्या तत्व व आचरणाविषयी इतक्या उलटसुलट गोष्टी सातत्याने समोर आणल्या जात असतात, की काय खरे व काय योग्य, तेही मुस्लिम मुलांच्या लक्षात येईनासे झाले आहे. त्यांना दिशा दाखवणारी उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. अशा कालखंडात सैफ़ुल्लाचा पिता सरताज यांनी घेतलेली भूमिका अधिकाधिक लोकांपुढे जाण्याची गरज आहे.
सैफ़ुल्ला जिथे लपला वा मारला गेला, तिथे कोणते साहित्य होते, कुठल्या लोकांच्या संपर्कात हा मुलगा होता, कोणत्या मनस्थितीत त्याने अशी कृत्ये केली, त्याची चर्चा नेहमीच होत असते. मुस्लिमांवर अन्याय, पक्षपात वा बेकारी, शिक्षणातील मागसलेपण अशा गोष्टी आता चावून चोथा झालेल्या आहेत. त्या सामान्य लोकांनाही तोंडपाठ झालेल्या आहेत. जगभर तीच तीच कारणे वा मिमांसा ऐकून लोकांना कंटाळा आलेला आहे. कारण जगातल्या कुठल्याही देशात वा समाजात त्याच समस्या आहेत. म्हणूनच त्या प्रत्येक समाजातील तरूण उठून घातपात वा हिंसाचाराच्या आहारी जाऊ लागला; तर जग नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. अशा गोष्टी सतत बोलून वा फ़ैलावून त्रस्त वा निराश लोकांना आणखी विध्वंसाच्या गर्तेत ओढणे अपायकारक आहे. उलट त्यातून अधिकाधिक लोकांना बाहेर काढण्याला प्राधान्य असले पाहिजे. ते प्राधान्य सैफ़ुल्लाचे दुखणे नव्हेतर सरताजच्या कृतीमध्ये दिसून येते. सरताज हा पिता कोणी बुद्धीमंत नाही की धर्ममार्तंड नाही. धर्माची नितीमत्ता वा शब्द त्याला ठाऊक नाहीत. पण जगण्यातला धर्माचा आशय व गरज त्याने नेमकी ओळखलेली आहे. म्हणूनच आपला मुलगा चुकला तर त्यालाही माफ़ी नाकारण्याचे मोठे धाडस त्याने करून दाखवले आहे. अशी माणसे शब्द कमी बोलतात आणि कृतीतून प्रेरणा देत असतात. त्याच्यापासून प्रेरणा घेण्याची कुवत आपल्यापाशी असायला हवी. पण दुर्दैवाने त्याचाच दुष्काळ बघायला मिळतो आहे. कारण गेले दोन दिवस मारल्या गेलेल्या सैफ़ुल्लाच्या मनस्थिती वा वागण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. पण पित्याने पुत्राचा मृतदेह नाकारून त्याच्यावर अंतिम संस्कारही करायला नकार देण्यातला मोठेपणा, कोणाला उघड्या डोळ्यांनी बघता आलेला नाही. यासारखे भारताचे दुर्दैव नसेल. ज्यांना सरताज म्हणजे डोक्यावरचा मुकूट बघण्यापेक्षा पायाला लागलेला चिखल बघण्यात धन्यता वाटते, त्यांच्या बुद्धीची कींव करणे भाग आहे.
देश व मायभूमीच आपली कर्मभूमी असते आणि आपले देशबांधव आपले सगेसोयरे असतात. माणसात मतभेद असतात. पण म्हणून एकमेकांचे जीव घेण्यानेच भांडणे संपवायची असतील, तर एक दिवस पृथ्वीतलावरची मानवजातच नष्ट होऊन जाईल. जर माणूसच अस्तित्वात राहिला नाही, तर धर्म कुठला आणि देश कुठला? माणूस हा पृथ्वीतलाचा स्वामी आहे आणि त्याच्या श्रद्धा व भावनेतून देव किंवा धर्माला जन्म मिळाला आहे. तो देवधर्म कोणता यावरून माणूसच माणसाच्या मूळावर आला, तर माणूसच संपून जाईल. मग कुठल्या धर्माचा विजय होणार आहे? कारण धर्म-देव अशा गोष्टी माणसाशी निगडित असतात. पशू प्राण्यांना धर्म वगैरे नसतो, की नितीमूल्येही नसतात. म्हणूनच धर्म जगवण्यासाठी आधी माणूस जगवला पाहिजे. माणुस जगवणे हाच पहिला सर्वात मोठा धर्म आहे आणि त्यासाठी आपली मायभूमी व देश यांना प्राधान्य असले पाहिजे. याची जाण त्या सरताज नावाच्या सामान्य बुद्धीच्या पित्याकडे नेमकी आहे. म्हणूनच त्याने धर्माच्या नावावर शहीद होण्याचा मुर्खपणा करणार्या पुत्रालाच नाकारण्याची हिंमत केलेली आहे. त्याचे उदाहरण जितक्या अधिक मुस्लिम लोकसंख्येसमोर जाईल, तितक्या कुटुंबात मुस्लिम मुलांसमोर चांगल्या विधायक जगण्याचे उदाहरण मांडले जाईल. पालकांच्या मनात अशा गोष्टी रुजल्या, तर त्यांच्या मुलांवर कोणी सईद हाफ़ीज वा अबु अल बगदादी आपले विष कालवू शकणार नाही. आपण जगलो पाहिजे आणि आपल्या सोबत हे सुंदर जग राहिले पाहिजे. तरच या पृथ्वीतलावर स्वर्गाचे निर्माण होऊ शकेल, असाच या सरताज नामक पित्याने कृतीतून दिलेला संदेश आहे. पण किती शहाणे त्यातला आशय ओळखू वा समजू शकले आहेत? खरी समस्या सैफ़ुल्ला नसून त्याच्या कृत्याचे अत्यंत चुकीचे वा गैरलागू विश्लेषण करणारे घातकी झालेले आहेत.