पुणे – ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी जाहिरात करत डी.एस कुलकर्णी यांनी हजारो लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण केले. यामुळेच डीएसकेंना समाजात प्रचंड मानसन्मान देखील मिळाला. मात्र ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आणि सर्वच चित्र क्षणात पालटले. डी.एस कुलकर्णी यांचा आत्ताचा फोटो पाहिला तर तुमचा तुमच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डी.एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा आरोपी म्हणून पोलिसांनी काढलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत हातात पाटी घेऊन उभे असलेल्या कुलकर्णी दाम्पत्याचा हा फोटो सध्याची त्यांची अवस्था सांगणारा आहे. या पाटीवर दीपक सखाराम कुलकर्णी (६८) आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती लिहिली आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या हातात देखील अशीच पाटी देण्यात आली आहे.
ड्रीम सिटी हा डीएसकेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ते स्वप्न अपूर्णच राहिले आणि डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. डीएसके आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. मराठी व्यावसायिकांना संपवण्यासाठी लॉबी कार्यरत आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. मात्र, डीएसकेंना आणि त्यांच्या पत्नीला अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात करण्यात आली.
बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले. मध्यमवर्गीयांना घरे मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र, ड्रीम सिटी प्रोजेक्टनंतर त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. आता डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील या दोघांचीही अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येते. डी. एस. कुलकर्णी यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर साम्राज्य उभे केले. मात्र, आर्थिक अडचणीत सापडल्याने आणि ग्राहकांचे पैसे वेळेत परत न केल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. कधीकाळी ऐशोआरामात जीवन जगणारे, आलिशान गाड्यात फिरणारे, पुण्याचे आयकॉन म्हणून पाहिले जाणारे डीएसके अडीच महिन्यांपासून तुरुंगात आहेत.