नवी दिल्ली-मराठवाड्याच्या मनीषा वाघमारेने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला आहे. या सोबतच एव्हरेस्टची मोहीम फत्ते करणारी ती मराठवाड्याची पहिली महिला गिर्यारोहक ठरली. सोमवारी सकाळी ८.१० वाजता मनीषाने सागरमाथ्यावर पाऊल ठेवले आणि ही चढाई पूर्ण केली.
क्रीडा विभाग प्रमुख
मूळची परभणी येथील मनीषा वाघमारे ही औरंगाबादेतील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख कार्यरत आहे. या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने १७ मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प १ कडे कूच केली होती. रविवारी (२० मे ) एव्हरेस्टच्या कॅम्प ४ वर पोहोचली. हवामान अनुकुल असल्याने रविवारी मध्यरात्रीच मनीषाने कँप चारवरून एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यास प्रारंभ केला आणि आज सकाळी ८ वाजून १० मिनिटाला तिने यशस्वी चढाई केली.
यापूर्वी गेल्या वर्षी निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असलेली मनीषा एव्हरेस्ट सर करण्यापासून अवघ्या १७० मीटरपासून वंचित राहिली होती; मात्र यंदा ही मोहीम तिने फत्ते केली.