मुंबई : बळीराजाला सुखावणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून वेळेत मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बळीराजानं कसलीही काळजी न करता, वेळेत पेरणीच्या तयारीला लागावं. अंदमान, केरळमार्गे मान्सून मुंबईत दाखल होईल आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसातंच साऱ्या महाराष्ट्रावर मान्सून स्वार होईल, अशी माहितीही हवामान खात्यानं दिली आहे.
यंदा अल नीनोचा प्रभाव मान्सूनवर नसल्याचंही कुलाबा वेधशाळेचे संचालक अजयकुमार यांनी म्हटलं आहे.काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुष्काळाची एक टक्काही शक्यता नसल्याचे स्कायमेटने सांगितले आहे. त्यामुळे स्कायमेटने बळीराजाला दिलासा दिला आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवामानाचा पहिला अंदाज वर्तवला जातो. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.