पुणे – महाराष्ट्रात सरासरी १०२ टक्के पावसाची शक्यता असून काही काळ पावसात खंड जाणवेल असा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञ आणि अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षातील हवामानाची स्थिती सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, आर्द्रता अशा विविध घटकांचा अभ्यास करून साबळे यांनी मान्सून मॉडेल विकसित केले आहे.
अतिवृष्टीचा अंदाज
राज्यभरातल्या विभागवार हवामान सेंटरवरुन साबळे डेटा गोळा करुन अंदाज व्यक्त करत असतात. विभागावर विचार करता अकोला, वाशिम बुलढाणा या भागात यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस आहे. तर नागपूरमध्ये १०० टक्के, यवतमाळमध्ये १०५ टक्के पावसाची शक्यता असून यवतमाळमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे. शिदेवाही चंद्रपूर इथे सरासरीच्या १०२ टक्के, परभणीमध्ये १०२ टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दापोलीमध्ये १०७ टक्के पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील निफाडमध्ये १०६, धुळे १०३, जळगाव मध्ये १०० टक्के पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर १०३, पाडेगाव १००, सोलापूर १००, राहुरी १००, पुणे १०२ टक्के पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस
मुंबईचा विचार केला तर गेल्या वर्षी मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. तशी स्थिती याही वर्षी होण्याची शक्यता असून जुलै किंवा ऑगस्टमध्ये मुंबईत अशा प्रकारचा पाऊस होईल, असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला. यंदा पाऊस चांगला असून मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा ज्यास्त पाऊस असला तरी जून जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडण्याचा अंदाज ही साबळे यांनी व्यक्त केला आहे. या महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, शिदेवाही आणि परभणी या भागात पावसात मोठे खंड पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दापोली, पाडेगाव आणि नागपूर भगत खंडित वृष्टी राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ खंड असे हवामान राहील.
शेतीचा विचार करता यंदापाऊस चांगला असला तरी शेतकऱ्यांनी चांगला ओलावा असल्याशिवाय पेरण्या करू नये असे साबळे यांनी सांगितले. राज्यातील सर्वच धरणे भरतील असे सांगत जायकवाडी उजनी सारखी मोठी धरणे याही वर्षी भरतील असे त्यांनी सांगितले. यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे साबळे म्हणाले. शेतकऱ्यांनी कडधान्ये पेरणीवर भर द्यावा, आंतरपीक घेण्याकडे कल ठेवावा, कापूस पीक कमी करण्यावर भर असावा असे सांगत गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या गोष्टीचा शेतकऱ्यांनी विचार करावा असा सल्ला साबळे यांनी दिला आहे.