श्रीहरीकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने गुरुवारी रात्री या वर्षातील उपग्रह प्रक्षेपणाची पहिली मोहीम घेतली, आणि ती यशस्वी ठरली. मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन रात्री ११.३७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४४ रॉकेट दोन्ही उपग्रहांना घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावले. कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या १.२ किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह आहे.
पीएसएलव्ही सी-४४ ने मायक्रोसॅट आरला कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या प्रयोगशाळेत मायक्रोसॅट आर उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी यशस्वी मोहिमेसाठी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.