बोलेरो गाडी कालव्यात कोसळल्याने जामनेरातील तीन जणांचा मृत्यू

0

सोलापूर/जामनेर :- टेंभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर पुलावरून बोलेरो कालव्यात कोसळून या अपघातात जामनेर, (जि.जळगाव) येथील चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला. जामनेरचे शेख फारुक शेख रमजान (५५), शेख फरहान शे एहसान (२२) व शेख तहरीम शेख जफर (१९) हे गोवा जाण्यासाठी जामनेरहून निघाले. घटनास्थळी पोलिस पोहचल्यावर मृतांपैकी एकाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरुन त्यांची ओळख पटली. तिघाचे मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहेत.

जामनेरहून गोव्याकडे बोलेरो (एमएच19- 9856) ने मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निघाले होते. करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ त्यांच्या बोलेरोचा आज सकाळी टेंभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर पुलावरून कालव्यात कोसळून अपघात झाला. यात  तीन जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वाहनासोबतच जामनेरचे दुसरे वाहन देखील होते. यात येथीलच १० जण होते. मात्र ते पुढे निघून गेले. तसेच पुढे गेलेल्या गाडीतील एकाने मागील गाडी का आली नाही याची विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता तो पोलिसाने उचलल्याचे समजते. नगरसेवक रिझवान शेख, खलील शेख हे सहकार्यांसह रात्रीच घटनास्थळाकडे रवाना झाले.