जम्मू-काश्मिरात तीन दहशतवादी यमसदनी !

0

अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे आज बुधवारी स्थानिक पोलीस, सीआरपीएफ व जवानांकडून संयुक्तरित्या राबण्यात आलेल्या विशेष मोहीमेत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. लश्कर ए तोयबाचा कमांडर नासीर चद्रू, जावेद फारूख आणि अकीब अहमद अशी या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. लश्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी होते.

आज बुधवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील पजलपोर भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली होती. यामध्ये एक जवान देखील जखमी झाला आहे. अद्यापही या संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला असून शोधमोहीम सुरूच आहे. अनंतनागमधील पजलपोर भागात दहशतवादी लपून बसले असून, मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. जवानांनकडून परिसरास वेढा देण्यात आल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. यावर जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रतित्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.