कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा संघर्ष मागील वर्षभरापासून पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. यावरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. दरम्यान आता तृणमूल कॉंग्रेस अर्थातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते भाजपा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपानं त्याचं स्वागत केलं आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चबांधणी सुरू केली आहे.