तळोदा तालुका परिसरात बिबट/वन्यप्राणी सदृश्य वावर असणाऱ्या गावांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन व ठोस उपाययोजना करणे
तळोदा तालुका राष्ट्रप्रथम फाँउंडेशन, तळोदा यांनी उपवनसंरक्षक यांना निवेदन
प्रतिनिधी तळोदा:–
तळोदा तालुका परिसरात बिबट/वन्यप्राणी सदृश्य वावर असणाऱ्या गावांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन व ठोस उपाययोजना करणे बाबत सामाजिक कार्यकर्ते, तळोदा शेतकरी, तळोदा तालुका राष्ट्रप्रथम फाँउंडेशन, तळोदा यांनी उपवनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे .
निवेदनाचा आशय असा,
उपरोक्त विषयान्वये आम्ही आपले लक्ष वेधितो की, तळोदा तालुका परिसरात दिवसेंदिवस मानव व हिस्त्र वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्ष हा वाढत चालला आहे. ह्या संघर्षातून होणाऱ्या हल्ल्यात पाळीव प्राणी व लोकांचा जीव जात आहे. तळोदा तालुका पंचक्रोशीचे अर्थकारण हे शेतीच्या आधारावर असल्याने शेतकरी व शेतमजुरांना बिबट हल्ल्याच्या भीतीमुळे शेतीकामे करणे कठीण झाले आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी वीज असल्याने शेतीपिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी हा रात्री – अपरात्री जीव मुठीत घेऊन जात असतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संरक्षण करणे याकरिता आपल्या सगळ्यांची भूमिका आहेच. पण अलीकडे तळोदा तालुका पंचक्रोशीत बिबट हल्ल्यांचे प्रमाणवाढल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 1 ऑगस्ट 2023 रोजीच्या दै. लोकमत ( हॅलो नंदुरबार, पान क्र. 3) या वृत्तपत्राच्या संदर्भाने तळोदा मेवासी वनविभागात 10च्या जवळपास बिबट्याचा संचार असल्याची माहिती आहे. वनविभागाच्या आकडेवारी 2019 मध्ये एक, 2020 आणि 2022 मध्ये प्रत्येकी दोन जानेवारी ते जून 2023 यादरम्यान आतापर्यत दोन अशा सात जणांचा बिबटच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अस्वलाच्या हल्ल्यात 2012 ते 2020 या काळात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील नागरिकांना दरदिवशी बिबटचे दर्शन होत असून त्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी व मृत्यूमुखी पडत आहे.
तळोदा तालुका परिसरात बिबट/वन्यप्राणी सदृश्य वावर असणार्या गावांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन व ठोस उपाययोजना करणेसाठी आपल्या विभागामार्फत खालील उपाय योजना राबविणे. –
१) पिंजरे संख्या वाढविणे.
२) गावा – गावांमध्ये मुख्यचौकात माहिती फलक (Banners) व त्यावर चित्रस्वरुपात (Cartoon Photographs) माहिती देणे आवश्यक आहे, कारण चित्र स्वरूप माहितीने अशिक्षित नागरिकांनी कशी काळजी घ्यावी हे लक्षात येईल.
३) जि. प. शाळेतील विध्यार्थ्याना जनजागृतीपर मार्गदर्शन करणे.
४) गावा – गावामध्ये पथनाट्यस्वरुपात मार्गदर्शन करणे.
५) गावा – गावामध्ये विडिओ चित्रफिताद्वारे मार्गदर्शन करणे.
६) वन व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण देणे.
७) चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर “बिबट समस्या मुक्तग्राम” ह्या सारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
वरील सूचित केलेल्या उपाययोजनेची आपल्या माध्यमातून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी व वाढत असलेला मानव व हिस्त्र वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष कमी व्हावा व तळोदा तालूक्यातील नागरिकांना ह्या भीतीदायी वातावरणातून मुक्त करावे.
वन्यजीवांचे जतन व संरक्षण करण्यासाठी आपण सारे मिळून आपल्या परिसरास लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगामध्ये यांचे अस्तित्व टिकविण्यसाठी शाश्वत पर्यत करूया.
ही नम्र विनंती !
“भारतीयांचे यातच मंगल सुरक्षित – जल,जंगल,जमीन,जन,जनावर”
यावेळी अजय परदेशी, जगदिश सुर्यवंशी,विराज गुरव,गिरीष कलाल, प्रशांत जावरे,राजेंद्र मोगल, तात्या वैदू, जगन्नाथ राजपूत व आशिष बारी आदी उपस्थित होते…