मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बयोपिक ‘ठाकरे’ सिनेमा कधी येणार याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा पहिला टीझर लॉन्च झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. आज दुपारी १.३० वाजता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे, पण या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.
अभिजीत पानसे दिग्दर्शित आणि खासदार संजय राऊत निर्मित बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात येणार आहे. बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला ‘ठाकरे’ सिनेमाचा टीझर पाहून रसिकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मात्र, तत्पूर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नाही. पण, शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच लाँच होईल, असे सांगितले आहे. त्यासाठी, शिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याचेही समजते.
बाळासाहेबांसोबतच उद्धव, राज, मीनाताई ठाकरे, मनोहर जोशी, शरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. मात्र, यातील काही बाबी आजच्या ट्रेलरमधून स्पष्ट होतील. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली.