नवी दिल्ली-दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत दलित आरक्षणाला विरोध करत सवर्ण समाजाने आज भारत बंदची हाक दिली आहे. याच धर्तीवर मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये हाय अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे.
सवर्णांकडून देण्यात आलेली भारत बंदची हाक पाहता मध्य प्रदेशमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याकडेच पोलीस यंत्रणांची नजर राहणार आहे. सद्यपरिस्थिती पाहता ठराविक भागांमध्ये शाळाही बंद राहणार असून, मध्य प्रदेशातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरक्षेच्या कारणांमुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात आणि धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा विरोध करत उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मोर्चे निघण्याचीही चित्र आहेत. या भारत बंदमध्ये नोएडा लोक मंच (एनइए), द ब्राह्मण समाज सेवा समिती, द अग्रवाल मित्र मंडळ सहभागी झाले आहे.