आज दुपारी चांद्रयान-2 झेपावणार अवकाशात

0

नवी दिल्ली: संपूर्ण भारतीय बनावटीचे आणि अतिशय महत्त्वाकांक्षी असा चांद्रयान-2 मोहिमेचे आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट असलेल्या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेअंतर्गत चांद्रयान-२चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात तांत्रिक अडथळ्यामुळे उड्डाणाच्या केवळ ५६ मिनिटे आधी हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते.

भारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात ‘इस्रो’ने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी त्यातील तांत्रिक अडचण तात्काळ दूर केली. यानंतर आज, सोमवारी त्याचे उड्डाण होणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चेन्नईपासून १०० किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित केले जाणार आहे.