चेन्नई : आज आयपीएलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईमध्ये सामना होणार आहे. ‘प्ले ऑफ’साठी आवश्यक १६ गुणांची कमाई केल्यानंतरही चेन्नई सुपरकिंग्स आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत वर्चस्वपूर्ण विजय मिळवून स्वत:चे अव्वल स्थान अबाधित राखण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. तीन वेळा जेतेपद पटकावलेल्या या दोन चॅम्पियन संघातील हा सामना चुरशीचा होणार आहे.
मुंबई १० सामन्यात १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतर येथे दाखल झालेल्या मुंबईकर विजयाच्या प्रयत्नात असतील. चेन्नईने वॉटसनच्या खेळीचे स्वागत केले. पण सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्याकडून अधिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
मुंबईचा यंदाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. त्यामुळे साखळी लढतीत अखेरच्या काही सामन्यात या संघाकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात या संघाची खरी ताकद फलंदाजीमध्ये आहे. पोलार्ड, डिकॉक, हार्दिक व कृणाल हे पांड्या बंधू यांच्यावर धावा काढण्याची, तसेच बुमराह अॅण्ड कंपनीवर टिच्चून मारा करण्याची जबाबदारी असेल. आतापर्यंत अपेक्षित खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माकडून दमदार खेळीची आशा आहे.