आणीबाणी लोकशाहीवरील कलंक ; मोदींसह भाजप मंत्र्यांनी जागवल्या आणीबाणीच्या आठवणी

0

नवी दिल्ली: देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. आजच्या दिवशीच 25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्याला आज 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भाजपच्या मंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असे म्हटले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. क्रीडा मंत्री किरण रीजुजी यांनी देखील आणीबाणीवर टीका केली आहे.

पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात संसदेत आणीबाणीवर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा काही भागही दाखविण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, 1975 मध्ये आजच्याच दिवशी आपल्याला राजकीय फायद्यासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशातील नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेतले होते. वृत्तपत्रांवर टाळे लावले होते. लाखो देशभक्तांना देशात पुन्हा लोकशाही आणण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या सर्वांना मी नमन करतो असं शहांनी लिहिले आहे.

राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा भारताच्या इतिहासातील सर्वांत गंभीर घटनांमधील एक घटना आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या संस्था आणि संविधानाला अखंड ठेवण्यासाठी अशा घटनांना आठवणीत ठेवणे गरजेचे आहे.