आज रंगणार फिफाचा महामुकाबला

0

रशिया- महिनाभरात झालेल्या ६३ सामन्यांच्या रणधुमाळीनंतर आज होणाऱ्या सामन्यातून क्रोएशियासाठी नवा इतिहास लिहिला जाणार आहे. २० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची फ्रान्सकडून पुनरावृत्ती घडणार, हाच एकमेव सवाल आता फुटबॉलशौकिनांच्या मनात उरला आहे. फ्रान्सची किलियान एम्बापे, अ‍ॅँटोइन ग्रीझमन, पॉल पोग्बा ही तरुण तुर्क सेना विश्वचषकावर नाव कोरणार की लुका मॉड्रिच आणि इव्हान रॅकिटिच बाजी मारणार हे रविवारी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर स्पष्ट होईल. हा क्षणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे.

रशियात सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी किंवा अगदी उपांत्य फेरीच्या सामन्यांपर्यंतदेखील अंतिम लढत ही फ्रान्स आणि क्रोएशिया या दोन देशांमध्ये होणार, अशी अपेक्षा कुणीच केली नव्हती. फुटबॉलमधील महासत्ता ओळखल्या जाणाऱ्या देशांचीच नावे त्यात प्रामुख्याने घेतली जात होती. जर्मनी, अर्जेंटिना, पोर्तुगाल, ब्राझीलसारख्या नामवंत खेळाडूंचा भरणा असलेले संघ अपयशी ठरले. मात्र सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत १९९८ सालच्या विश्वविजेत्या फ्रान्सने पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापेक्षा मोठी कमाल तर क्रोएशियाने करून दाखवली.

उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतानाच दोन वेळा पेनल्टी शूटआऊटचे सहाय्य घ्यावे लागलेला क्रोएशिया तिथपर्यंत पोहोचला म्हणजेच खूप झाले असे अनेक जण मानत होते; परंतु उपांत्य सामन्यात इंग्लंडसारख्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला पराभूत करून त्यांनी सगळ्यांनाच चकित केले आहे. त्यामुळे कुणालाही अनपेक्षित असलेला फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया असा अंतिम सामना यंदा रंगणार आहे. ज्यांच्या नावाचा गवगवा होता अशा लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार यांच्यापैकी एकही संघ अंतिम फेरीत पोहोचू न शकल्याने अनेकांना दु:ख झाले; परंतु यानिमित्ताने एम्बापे, ग्रीझमन, रॅकिटीचसारखे काही नवीन तारे उदयाला येत असून तेच या विश्वचषकाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. फ्रान्सचा कर्णधार गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीस आणि क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिच हे दोघेही आपापल्या विजयाबद्दल आत्मविश्वास बाळगून आहेत.

विश्वचषकातील सर्वाधिक दुसरा युवा संघ म्हणून फ्रान्सचा संघ ओळखला जातो. एम्बापेसारखा प्रचंड वेगवान आक्रमक आणि त्याला ग्रीझमानची लाभलेली अनोखी साथ त्यामुळे फ्रान्सचा संघ हा संपूर्ण विश्वचषकात एखाद्या विजेत्याप्रमाणे संचार करत अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचला आहे.