ताजमहल पाहण्यासाठी आजपासून मोजावे लागणार अधिकचे पैसे

0

नवी दिल्ली-जगातील सात अश्चर्यांपैकी एक असणारे ताजमहल पाहण्यासाठी आजपासून देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीयांसाठी असलेल्या प्रवेशशुल्क १० तर परदेशी पर्यटकांसाठीच्या प्रवेश मुल्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने ताजमहलबरोबरच देशातील इतर १७ ऐतिहासिक प्रेक्षणिय स्थळांवरील प्रवेशशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असणार दर
ताजमहल पाहण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशमुल्यात याच वर्षी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १० रुपयांनी प्रवेशशुल्क वाढण्यात आल्यासंदर्भातील नोटीस सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केली आहे. वाढलेल्या प्रवेशशुल्कानुसार आता भारतीय पर्यटकांना ४० ऐवजी ५० रुपये द्यावे लागतील तर परदेशी पर्यटकांना एक हजार ऐवजी ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. दक्षिण आशियातील म्हणजेच सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता सार्क देशातील पर्यटकांना ५४० ऐवजी ५५० रुपये भरुन ताजमहल पाहता येईल.

कॅशलेश व्यवहारावर सूट
ताजमहल पाहायला जाणाऱ्या पर्यटकांनी कॅशलेस माध्यमातून प्रवेशशुल्क भरल्यास त्यांना विशेष सूट देण्यात येणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यास त्यांना प्रति तिकीट पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना प्रति तिकीट ५० रुपये सूट मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थळांच्या प्रवेशशुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थळांवर जायला आता १५ ऐवजी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. ताजमहलसोबत दिल्लीतील आणखी आठ ऐतिहासिक इमारतींच्या प्रवेशशुल्कात वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला, हुमायुनूची कब्र आणि कुतूबमिनार हे ‘अ’ श्रेणीतील तर जंतर मंतर, खान-ए-खाना, पुराना किल्ला, तुघल्काबाद किल्ला, कोटला फिरोजशहा आणि सौदरजंगची कब्र ही ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थले पाहण्यासाठीही पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.