आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा वन-डे सामना !

0

विशाखापट्टणमः भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयाची परंपरा कायम राहण्यासाठी भारतीय संघ ते सज्ज आहेत, तर पराभवातून शिकवण घेत विंडीजचा संघ पुनरागमनासाठी आतुर आहे. जय-पराजयाच्या निकालापलीकडे भारतीय संघासाठी हा सामना विशेष महत्त्वाचा आहे.

लिड्स येथे 13 जुलै 1974 साली भारतीय संघाने पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळला. त्यानंतर 44 वर्षांच्या कालखंडात भारतीय संघाने अनेक विक्रमांची नोंद केली, अनेक ऐतिहासिक जेतेपद जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वन डे क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या मालिकेत यश मिळवून भारताला अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. तसेच वन डे क्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेली कामगिरी आज भारतीय संघ करणार आहे.

आजचा सामना खेळल्यानंतर 50-50 षटकांच्या या क्रिकेट प्रकारात 950 सामने खेळणारा भारत हा पहिला संघ ठरणार आहे. सर्वाधिक वन डे सामने खेळण्याचा विक्रम भारताने याआधीच आपल्या नावावर केला आहे. पण, सर्वाधिक विजय मिळवण्याच मान ऑस्ट्रेलियाला जातो. त्यांनी 916 सामन्यांत 556 विजय मिळवले आहेत. भारताने 949 सामन्यांत 490 विजय मिळवले आहेत.