पिंपरी-चिंचवड : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक जाणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात देखील आकुर्डी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होण्याची शक्यता आहे. चाकण आंदोलनाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड शहरात होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी 120 पोलीस अधिकारी आणि 1 हजार कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत.
जुन्या महामार्गावर दक्षता
पिंपरी-चिंचवड शहरातून जुना पुणे-मुंबई महामार्ग जातो. हा मार्ग शहरातील महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा न होण्याच्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते ज्या मार्गावरून जाणार आहेत, त्या मार्गावरील वाहतुकीवर ताण आल्यास त्यासाठी पर्यायी मार्ग ठरविण्यात येणार आहेत. प्रत्येक चौकामध्ये पोलीस तैनात करण्यात आले असल्याने वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पोलीसांची नागरिकांना मदत होणार आहे.
मराठा क्रांती मोर्चामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी शक्य तेवढ्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यात येणार आहे. शहरातील बहुतांश भाग सीसीटीव्ही कॅमे-याच्या निगराणीखाली आहे. त्यामुळे शांततेत पार पडणारे आंदोलन बिघडवू पाहणार्या कंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पोलिसांना सहकार्य करावे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी अधिक कुमक मागविण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था चोखपणे पाळली जाणार आहे. आंदोलक व सर्व सामान्य नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
-मंगेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परीमंडळ तीन