बंगळुरु: कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आल्यानंतर, आता काँग्रेस-जेडीएस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आज दुपारी तीन वाजता बहुमत सिद्ध करायचे आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. त्यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असं राज्यपाल वाजूभाई वाला यांनी सांगितलं. पण कुमारस्वामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
११७ आमदार असल्याचा दावा
काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ असे ११६ तसेच एका अपक्षासह ११७ आमदार असल्याचा दावा काँग्रेस-जेडीएस आघाडीने केला आहे. १५ मे रोजी निकाल लागल्यापासून ९ दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्येच ठेवले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष २२४ पैकी २२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०४ जागा मिळवल्या. त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर कर्नाटक विधानसभा निकालाचा वाद सुप्रीम कोर्टात गेला.
येडियुरप्पा यांनी १७ मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर १९ मे रोजी अवघ्या ५५ तासात म्हणजेच अडीच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. सुप्रीम कोर्टाने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १९ मे रोजी दुपारची मुदत दिली होती. भाजपला बहुमताचा ११२ हा आकडा गाठणे अशक्य होते. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता. पण त्यांना ते शक्य झाले नाही.