वकिलावर प्राणघातक हल्ला; आज पुण्यातील न्यायालयीन कामकाज बंद

0

पुणे : पुणे बार असोशिएशनचे सभासद अ‍ॅड.देवानंद ढोकणे यांच्यावर काल सोमवारी रात्री गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर व जिल्ह्यातील वकील संघटना आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्यात आल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

अ‍ॅड. देवानंद रत्नाकर ढोकणे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचा भाऊ भरत ढोकणे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. भरत ढोकणेदेखील फौजदारी तसेच कौटुंबिक खटल्यांचे कामकाज पाहतात. अ‍ॅड. ढोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकील आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ येथे जमून आज दुपारी १२ वाजता या घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.

अ‍ॅड. देवानंद आणि त्यांचे बंधू भरत ढोकणे यांनी काल न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आपल्या पक्षकारांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यानंतर ते रात्री आठच्या सुमारास घरी निघाले. भरत ढोकणे हे कार चालवत होते. दरम्यान पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोराने कारमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या देवानंद यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या व ते पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी एक पुंगळी मिळाली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्लेखोरांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.