मुंबई- आंतरराष्ट्रीय दर्जाचे अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला असून, आजपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होत आहे. आज दुपारी 3 वाजता शिवस्मारकाच्या उभारणीसाठी पायाभरणीची सुरुवात केली जाईल, अशी माहिती आहे.
शिवस्मारक उभारणीचे कंत्राट ‘ऍण्ड टी’म्हणजेच लार्सेन आणि टुब्रो कंपनीला दिले आहे. खरंतर प्रत्यक्ष बांधकाम 12 मार्च 2018 रोजी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ते आतापर्यंत सुरू झाले नव्हते, अखेर शिवस्मारकाच्या कामास अखेर प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, बांधकामाचा खर्चदेखील 643 कोटी रुपयांनी वाढला असल्याची माहिती आहे.1 मार्च 2018 पासून 36 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीच्या करारामध्ये होत्या. मात्र तांत्रिक समितीची मान्यता नसल्याने स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी साडे सात महिन्यांनी मुदत वाढली. शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने शिवस्मारकाची संकल्पना मांडत घोषणा केली होती. त्यानंतर, स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकीय प्रवासात रखडला होता. अखेर शिवसेना-भाजपा युती सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या मिळवत स्मारकाचे जलपूजन झाले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.