मुंबई: नुकतेच बिग बॉस मराठी-२ संपले आहे. शिव ठाकरे हे बिग बॉस-२ चे महाविजेते ठरले. आता प्रतीक्षा लागून होती, हिंदी बिग बॉस १३ ची. ही प्रतीक्षा संपली आहे. आजपासून बिग बॉस हिंदीच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आज रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 13’चा धमाकेदार शो प्रीमिअर शो प्रसारित होईल. यंदा शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. सोबत अनेक नव्या गोष्टीही. बिग बॉसचे यंदाचे 13 वे सीझनही सलमान होस्ट करणार आहे.
‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदा सीझन 13 चा सेट मुंबईस्थित गोरेगावच्या फिल्म सिटीत उभारण्यात आला आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या सर्व सीझनचे शूट लोणावळा येथे झाले. ‘बिग बॉस 13’ची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही. ओमंग कुमार यांनी प्लास्टिक न वापरता ‘बिग बॉस’च्या घराला अतिशय कलरफुल लूक दिला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात यावेळी प्रथमच स्पर्धकांना महिलेचा आवाज ऐकायला मिळणार आहे. चर्चा खरी मानाल तर बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल यावेळी पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात राहिल. ती यावेळी स्पर्धकांना टास्क देईल. घराची मालकीण म्हणून ती दिसणार आहे.
यंदाच्या सीझनचे खास वैशिष्ट्य म्हणजे, एका महिन्याच्या आत स्पर्धक फिनालेत आपली जागा पक्की करतील. अर्थात 4 आठवड्यानंतर या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतील आणि यानंतर मेन फिनाले येईल. नेहमीप्रमाणे हे सीझनही थीम बेस्ड असेल. यावेळी ‘बिग बॉस’च्या घराची थीम म्युझियम आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे घर पाहणे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.